रत्नागिरी : अमली पदार्थांच्या विरोधात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन प्रचार, प्रसिद्धी करावी. अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत माहितीपट प्रदर्शित करावा. ज्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारीच्या केसेस प्रलंबित आहेत, त्यांनी त्या तत्काळ मार्गी लावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
नार्को को-ओर्डनिशन यंत्रणेची जिल्हास्तरीय समिती बैठक झाली. या बैठकीला पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार आढावा घेतला. ते म्हणाले, शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस उपअधिक्षक कार्यालयाकडे प्रलंबित तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून, सतर्क राहून कारवाई करावी. विशेषतः सागरी मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करावे.
पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले, जंगल भागात गांजाचे पीक घेण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने त्याबाबत तपासणी करावी. पोलिस, कस्टम, उत्पादन शुल्क, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, एमआयडीसी अधिकारी या सर्वांनी अंमली पदार्थ विक्री पेडलर, निर्मिती करणारे कारखाने याबाबत सतर्क राहून तपासणी करावी, संयुक्तपणे कारवाई करावी. नशामुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी नियोजन करुन कारवाई करावी. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 31/Oct/2025












