दापोली : दापोली-मंडणगड या वर्दळीच्या महामार्गावर खोंडा परिसरात तलघरकर यांच्या सर्व्हिसिंग सेंटरसमोर आणि ‘मोहम्मद पॅराडाईज’ इमारतीजवळ असलेली विजेची उघडी डीपी (वितरण पेटी) नागरिकांसाठी गंभीर धोका बनली आहे. या उघड्या डीपीमुळे परिसरातील रहिवासी, शाळकरी मुले आणि महामार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक यांना याचा धोका आहे. संभाव्य शॉर्टसर्किट, विजेचा धक्का किंवा मोठा अपघात घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
महामार्गालगत वाहने थांबतात, तसेच जवळच निवासी इमारती असल्याने लहान मुलांची सतत ये-जा असते. अशा स्थितीत सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत. या डीपीला आवश्यक ते संरक्षक कव्हर किंवा जाळी नसल्यामुळे ती पूर्णपणे उघडी आहे. पावसाळ्यात धोका आणखी वाढतो. पाण्याचा संपर्क झाल्यास कोणतीही दुर्घटना होऊ शकते, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. महामार्गावरील ही धोकादायक डीपी तातडीने दुरुस्त करून सुरक्षित कव्हर बसवावे, अशी मागणी नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केली आहे. कोणतीही अनर्थकारी घटना घडण्यापूर्वी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 04/Nov/2025














