रत्नागिरी : दिवाळीची सुट्टी संपल्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून बंद असलेली ज्ञानमंदिरे सोमवारी पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली आहेत. दरम्यान, दिवाळीपूर्वी सर्व शाळांच्या प्रथम सत्र परीक्षा झाल्या असून निकाल तयार करण्याची शिक्षक वर्गाची लगबग सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व बहुतांश शाळांना १६ ऑक्टोबर तर काही शाळांना १७ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे सुमारे १४ ते १५ दिवस ही ज्ञानमंदिरे बंद होती. दिवाळीनंतर जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या सर्व माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा या गेल्या आठवड्यातच सुरू झाल्या होत्या. वर्ग भरल्यामुळे गेल्या काही
रत्नागिरी: दिवाळी सुट्टीनंतर मैदानावर शालेय मुलांचा किलबिलाट सुरू झाला आहे.
दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या आहेत. शाळा पूर्व तयारीसाठी शाळा सुरू होण्याच्या एक ते दोन दिवस आधीपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत हजर झाले होते. काही दिवस बंद असलेल्या वर्गखोल्यांची साफसफाई, स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, आदी स्वच्छतेच्या कामांची लगबग बहुतांश शाळांमध्ये सुरू होती. शाळा प्रांगण व परिसर झाडून लख्ख करण्यात आले होते.
सोमवारी दिवाळी सुट्टीनंतर शाळा भरल्याने पहिल्या दिवशी दुरावलेले मित्र मैत्रिणी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहिला. बहुतांश दिवाळी सुट्टीपूर्वी शाळांच्या प्रथम सत्र परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करण्यात येत आहेत.
आपापल्या विषयाचा निकाल व विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करण्याची कामे पूर्ण करुन मुख्याध्यापकांकडून शिक्कामोर्तब करुन घेणे आदी कामांमध्ये शिक्षक वृंद व्यस्त आहे. रविवारी सुट्टीत ठेवून दिलेले शैक्षणिक साहित्य बाहेर काढून उजळणीची लगबग सुरू होती. सोमवारी जिल्हाभर पाऊस असल्याने छत्री घेवून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागले.
सुट्टीतील गमती-जमती अन् हास्याचे फवारे दीपोत्सवाच्या सांगतेनंतर बरेच दिवस शाळा-महाविद्यालये बंद होती. दिवाळीनंतरही पै-पाहण्यांची वर्दळ कायम होती. त्यामुळे अनेकांना दिवाळीत मामा-मावशीच्या गावाला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर अनेकांनी देवदर्शन पर्यटन सहलींचे बेत आखले होते. कौटुंबिक गेटटुगेदरही उरकून घेतले. यामध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला. शाळेच्या पहिल्या दिवशी सुट्टीतील गमती-जमती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर केल्या जात होत्या. मित्र-मैत्रिणीचे गटागटाने सुट्टीतील गमती-जमती ऐकताना हास्याचे फवारे उडाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 04/Nov/2025














