चिपळूण : नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूणमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ४२ हजार ५८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष २०,९८६, तर महिला २१,५९६ मतदार असून महिला मतदार यावेळी चिपळूणचा नगराध्यक्ष ठरवणार आहेत.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. चिपळूण शहरामध्ये एकूण १४ प्रभाग असून २८ नगरसेवक निवडून येणार आहेत तर नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. शहरात प्रशासन ४८ मतदान केंद्र उभारणार आहे. १० तारखेपासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, न.प. चे मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य उपस्थित होते. निवडणुकीच्या काळात नागरिकांसह उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची १९ पथके तयार करण्यात आली आहेत. यात पाच फिरती पथके तर शहर हद्दीत पाच ठिकाणी चेक नाके तयार केले जाणार आहेत. कापसाळ, पेढे, कळंबस्ते, खेर्डी, गुहागर बायपास, गांधारेश्वर आदी ठिकाणांचा समावेश आहे. दोन फिरती पथकेही तैनात असणार आहेत.
निवडणुकीसाठी शहरात एक सखी मतदान केंद्र तर दुसरे आदर्श मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व जिल्हा प्रशासन शस्त्रे ताब्यात घेणार आहेत. रात्री १० च्या आत प्रचार थांबवावा लागेल. या शिवाय ३० नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. मतदान सकाळी ७ ते सांयकाळी ५ पर्यंत सुरू राहील तर मतमोजणी ३ रोजी शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल येथे होणार आहे. त्या ठिकाणी स्ट्रॉग रूम तयार करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतपेट्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येतील. ३ रोजी सकाळी १० पासून मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारी १ पर्यंत नगर परिषदेचा सर्व निकाल जाहीर होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदासाठी ११ लाख, नगरसेवकासाठी साडेतीन लाखांची खर्च मर्यादा
यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्वच पक्षांनी करणे बंधनकारक आहे. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवार व पक्ष पदाधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली आहे व त्यांना आचारसंहितेचे नियम सांगण्यात आले आहेत. यावेळी निवडणूक आयोगाने निवडणूक उमेदवारांना खर्चाची मर्यादा घातलेली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ११ लाख २५ हजार रुपये तर नगरसेवक पदासाठी ३ लाख ५० हजारांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 08/Nov/2025












