Chiplun saf yeast company : साफयिस्ट कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे १४ नोव्हेंबरपासून उपोषण

चिपळूण : साफ यिस्ट कंपनीने कामावरून तडकाफडकी काढलेल्या सुमारे २४० कंत्राटी कामगारांना पुन्हा रूजू करून घेण्याचे सोडून घेतलेल्या कामगारांनाच कमी करण्याचा सपाटा कंपनी व्यवस्थापनाने लावला आहे. यामुळे या आडमुठ्या धोरणाविरोधात स्थानिकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे.

कंपनी मालक व अधिकारी कोणालाही जुमानत नसल्याने स्थानिक कामगार आक्रमक झाले आहेत. या संतप्त कंत्राटी कामगारांनी कंपनी विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारत १४ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

साफयिस्ट कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या स्थानिक कामगारांनी संघटीत होऊन पगारवाढ, कायम नोकरी, ग्रॅच्युएटी, सार्वजनिक व साप्ताहीक सुट्टया आदी मूलभूत हक्कांसाठी लढा सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर कंपनीने अचानक २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. कोणतीही पूर्वकल्पना न देता कच्चा माल नसल्याचे कारण देत उत्पादन बंद केले व कंत्राटी कामगारांना कमी केले. यानंतर १३ ऑक्टोबरला रत्नागिरी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन, संघटना प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक झाली. यानंतर ३० ऑक्टोबर रोजी कंपनीने काही कामगारांना कामावर घेत ५८ कामगारांना बाहेर ठेवले. या निर्णयामुळे सुमारे ७० कुटुंबांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, असा आरोप कामगारांनी केला.

याबाबत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला असल्याचेही कामगारांनी सांगितले. त्यानंतरही कामगारांना पुन्हा कामावर घेतले गेले नाही. या संदर्भात कामगारांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांनाही निवेदन सादर केले आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील कंपनीमध्ये सध्या ठेकेदाराच्या माध्यमातून कामगार ‘भरती केली जात असून ज्यांना कामावर घेतले आहे त्यांनाही व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरपर्यंत सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेतले नाही तर १४ नोव्हेंबरपासून साफयिस्ट कंपनीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 11/Nov/2025