◼️ रत्नागिरी जिल्हा बँक, सहकार बोर्ड आणि चोरगे कृषी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम; डॉ. तानाजीराव चोरगे अध्यक्षस्थानी, आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी : ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त (72nd All India Cooperative Week) रत्नागिरी जिल्ह्यात सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी एका भव्य ‘सहकार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी हा मेळावा संपन्न होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी १०.३० वाजता चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील डॉ. तानाजीराव चोरगे कृषी महाविद्यालय सभागृहात सुरू होईल.
‘सहकारातून ग्रामीण विकास’ हा मुख्य विषय
“सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला बळकटी देणे” हा या वेळच्या सहकार मेळाव्याचा मुख्य विषय आहे. याच विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार, कृषी, आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांची मांदियाळी
या महत्त्वपूर्ण मेळाव्याचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, कृषिभूषण मा. डॉ. तानाजीराव चोरगे हे भूषवणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक मा. श्री. शेखरजी निकम, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मा. डॉ. सोपानजी शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. बाबाजीराव जाधव, नाबार्ड (NABARD) चे जिल्हा विकास अधिकारी मा. श्री. महेश टिळेकर, आणि रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष मा. श्री. हेमंतजी वणजु हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ देखील या मेळाव्यात सहभागी होणार आहे.
तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन
या मेळाव्यात ग्रामीण विकासाच्या विविध पैलूंवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक मा. श्री. शिवकुमार सदाफुले, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उप आयुक्त मा. डॉ. दत्तात्रय सोनावले, आणि कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख मा. डॉ. संतोष वरवडेकर यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी बांधव आणि सहकारात रुची असलेल्या नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 11-11-2025














