Sahyadri Tiger Reserve : “ऑपरेशन तारा” अंतर्गत ‘चंदा’ वाघीणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर

रत्नागिरी : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) ताडोबा-अंधारी (TATR) व पेंच (PTR) व्याघ्र प्रकल्पांमधील आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (STR) स्थलांतर करण्यास मंजुरी दिली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” अंतर्गत ताडोबातील T20-5-2 या तीन वर्षांच्या तरुण वाघीणीचे सुरक्षितरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केले.

भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत वाघीणीला ताडोबातील खडसांगी परिक्षेत्रातून NTCA च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार पकडण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करून विशेष वन्यजीव वाहतूक वाहनातून तिला चांदोलीच्या सोनारली येथील एनक्लोजरमध्ये आणण्यात आले. “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने येथे acclimatization प्रक्रियेअंतर्गत तिचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जवळपास १००० किमीचे अंतर २७ तासांत पार करून वाघीणीला सुरक्षित पोहोचवण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुरू झालेली पकड मोहीम संध्याकाळी ५ वाजता यशस्वी झाली. सर्व तपासण्या पूर्ण करून रात्री १० वाजता टीमने कराडकडे प्रयाण केले व शुक्रवारी पहाटे १.३० वाजता चांदोलीत आगमन झाले.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्न्हेलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल ऋषीकेश पाटील, प्रदीप कोकितकर, किरण माने, तसेच फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, संशोधक आकाश पाटील आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.

सह्याद्रीसाठी ऐतिहासिक टप्पा क्षेत्र संचालक तुषार चव्हाण
“ऑपरेशन तारा ही सह्याद्रीतील वैज्ञानिक व्याघ्र पुनर्स्थापना कार्यक्रमाची सुरुवात आहे. आमच्या पथकाने अत्यंत जबाबदारीने वाघीणीचे स्थलांतर पूर्ण केले,” असे तुषार चव्हाण म्हणाले.

महत्त्वाचा मैलाचा दगड प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी
“ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांनी केलेले वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य कौतुकास्पद आहे,” असे रेड्डी यांनी सांगितले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता या वाघीणीचे नवीन नाव तारा असे ठेवण्यात आले असून तिचा सांकेतिक क्रमांक STR T 04 असा आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 14/Nov/2025