रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल आणि शासकीय योजनांबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एका विशेष साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७’ या महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदींची माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपमुख्य लोकअभिरक्षक, श्री. उन्मेश मुळये यांनी ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७ या कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी कायद्यातील प्रमुख तरतुदी, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि त्यांना मिळणारे संरक्षण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर सहाय्यक लोकअभिरक्षक, श्रीमती आयुधा देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि योजनांचे स्वरूप यावर त्यांनी प्रकाश टाकला, ज्यामुळे उपस्थित ज्येष्ठांना शासकीय मदतीबद्दल स्पष्टता मिळाली.
कार्यक्रमाचे सचिव मा. श्री. आर. आर. पाटील यांनी ‘नालसा (NALSA) स्कीम फॉर सिनियर सिटिझन्स २०१६’ (ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना) याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विधी सेवा कशी मिळू शकते, तसेच त्यांच्या कायदेशीर समस्यांचे निराकरण कसे केले जाते, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. हा साक्षरता कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणारा आणि त्यांना कायदेशीर बाबींमध्ये सक्षम बनवणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:51 PM 18/Nov/2025













