लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे गावात गेली दोन दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्री-अपरात्री लोकवस्तीत शिरून डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने आपला मोर्चा खेरवसे गावात वळवला आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस बिबट्या खेरवसे बौद्धवाडी, गुरववाडीमध्ये सायंकाळी, रात्री-अपरात्री नागरिकांच्या नजरेस पडत आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान बिबट्या बौद्धवाडी येथे एका झाडावर बसलेला दिसून आला.
नागरिकांनी आरडाओरडा केला असता बिबट्या उडी मारून बाजूच्या जंगलात पसार झाला. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटांनी बिबट्या घराच्या शेजारी येऊन जोरजोरात ओरडत असल्याने नागरिकांनी पुन्हा बिबट्याला पिटाळून लावले. मात्र तासाभराने बिबट्या लोकवस्तीत शिरला व जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे नागरिक बिबट्याने दहशतीखाली वावरत आहेत.
बौद्धवाडी येथील दोन घरांच्या अंगणात येउन बिबट्या डरकाळ्या फोडू लागल्याने रविवारी व सोमवारी नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली. रात्रीपासून ते पहाटेपर्यंत बिबट्या ओरडत होता, तर मंगळवारी रात्री बिबट्या लोकवस्तीत शिरून कधी रस्त्यात आडवा, तर कधी नागरिकांच्या घरांच्या बाजूला येऊन ओरडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले दोन दिवस नेहमी डरकाळ्या फोडणारा बिबट्या जखमी झालेला असावा, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी खेरवसे ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी लांजा वनविभागाला दिली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 19/Nov/2025













