रत्नागिरी : पावसाने आपला मुक्काम उशिरापर्यंत ठेवला होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारे बंधारे बांधण्याचे काम यंदा लांबणीवर पडले. अर्थात, उशिरापर्यंतचा पाऊस आणि लांबलेले बंधारे यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकटही लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ८ हजार ६६५ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नदीनाल्यांद्वारे समुद्राला जाऊन मिळते. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रशासन तयारीला लागले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी दवर्षीप्रमाणे यंदाही ‘मिशन बंधारे’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधारे उभारण्यात येणार आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीला सुमारे १० किंवा त्यापेक्षा जास्त बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन श्रमदानातून हे बंधारे उभारण्यात येत आहेत.
यंदा जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. दरवर्षी बंधारे उभारण्याचे काम गांधी जयंतीला २ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येते; मात्र, पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे बंधारे उभारण्याचे काम यंदा उशिरा सुरू झाले. जिल्ह्यात ९ तालुक्यातील ७९३ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ८ हजार ६६५ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाने समोर ठेवले आहे. सध्या बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून ४३ बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ९ कच्चे बंधारे, वनराई बंधारे २४ आणि १० विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:31 PM 21-Nov-25














