khed General Election | खेड नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

खेड : खेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता चरमसीमेवर पोहोचली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या घडामोडींनी निवडणूक समीकरणात मोठेच बदल घडवले आहेत. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत २१ अर्ज बाद झाल्यानंतर ६९ उमेदवार रिंगणात उरले होते. मात्र अंतिम दिवशी १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेरीस ५० जणांची नावं रिंगणात कायम
राहिली आहेत.

नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतही मोठा बदल घडला आहे. आरंभी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीत अपात्र ठरले व पाच उमेदवार स्पर्धेत होते. परंतु आता अखेरच्या क्षणी वैभवी वैभव खेडेकर आणि तेजल प्रेमळ चिखले यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला, उद्धब बाळासाहेब ठाकरे गटाच्या सपना ऋषिकेश कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव या तीन महिला उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.

यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्वेचा मुद्दा म्हणजे ‘महा’ विरुद्ध ‘महा’ अशी थेट लढत होणार हेच. खेड शहरात भाजप-शिवसेना महायुतीने एकजूट ठेवत औपचारिकरीत्या संयुक्तरीत्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर काही बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही पक्षनिष्ठेला प्राधान्य देत आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक सरळसरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार, हे चित्र स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार मैदानात असल्या, तरी मुख्य लढत माधवी बुटाला विरुद्ध सपना कानडे अशी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. दोन्ही बाजूंचे नेते व कार्यकर्ते प्रचारात जोमाने उतरले असून संवादसभा, जाहीर भेटीगाठी आणि सोशल मीडियावरील मोहिमा वेग घेत आहेत. मात्र या दोघींच्या स्पर्धेत बंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनदेखील मतांची आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

खेड नगर परिषद निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस चढत असून सर्वच पक्षांनी आपापली राजकीय गणिते अधिक मजबूत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीचा एकत्रित पवित्रा, महाविकास आघाडीची आक्रमक रणनीती आणि तिरंगी नगराध्यक्ष लढत या तिन्ही गोष्टींमुळे निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. आगामी दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून खेडकर मतदार कोणाचा झेंडा उंचावतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 22-Nov-2025