राजापूर : नियमित सोयीची दिलेली बस अचानक रद्द करून त्या ऐवजी देण्यात आलेली पर्यायी बस वेळेवर येत नसल्यामुळे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानामुळे संतप्त झालेल्या ओझर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राजापूरकडे येणारी बस रोखून आंदोलन केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आमची नियमित बस पूर्ववत सुरु करा आणि आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी जोरदार मागणी आंदोलन महाविद्यालयीन विद्याथ्यांनी त्यावेळी केली. यावेळी विद्यार्थी कमालीचे आक्रमक झाले होते.
तालुक्याच्या ओझर परिसरातून सुमारे २५ पासधारक महाविद्यालयीन विद्यार्थी ओणी आणि राजापूरला दररोज येत असतात. त्यांच्यासाठी राजापूर आगारातून या पूर्वी सकाळी सहा वाजता ओझरकडे जाणारी बस सुटत होती. त्यानंतर ती बस पुन्हा राजापूरकडे येत असे. त्यामुळे ती गाडी शालेय विद्यार्थ्यांसह समस्त प्रवाशांना उपयुक्त ठरत होती. त्या गाडीमुळे समस्त विद्यार्थी वेळेवर ओणी आणि राजापूर येथे वेळेवर शाळा, विद्यालयासह महाविद्यालयात जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा या गाडीलाही चांगलाच फटका बसला आहे.
राजापूर आगाराने अचानक ही गाडी बंद करून त्या ऐवजी तालुक्याच्या पूर्व परिसरातून सुटणारी येरडव-राजापूर या गाडीची ओझरमार्गे फेरी सुरू केली आहे. मात्र, ही गाडी सकाळी ८ वाजल्यानंतरच ओझरला येत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत असून समस्त विद्यार्थ्यांना विलंबाने शाळा आणि महाविद्यालय जावे लागत आहे. परिणामी विद्याथ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांना हा पवित्रा घ्यावा लागला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 27/Nov/2025














