Gold Silver Rates : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्स किंवा मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव २८८ रुपयांनी घसरून ७८,१४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी ६३१ रुपयांनी घसरून ९६,४०१ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचे भाव उच्च पातळीवरुन नफावसुलीमुळे घसरले. मात्र, मध्यपूर्वेतील तणाव, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीची अपेक्षा आणि २०२४ च्या अमेरिकी निवडणुकीबाबतची अनिश्चितता यामुळेही सोन्याबाबत सकारात्मक संकेत आहेत.
गुरुवारी घसरण
सराफांची मागणी कमी झाल्यानं गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खाली आले होते. ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनं ३०० रुपयांनी घसरून ८१,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झालं. औद्योगिक युनिट्स आणि नाणे निर्मात्यांची मागणी मंदावल्यानं चांदीचे दरही १००० रुपयांनी घसरून १.०१ लाख रुपये प्रति किलो झाले. यामुळे येत्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला.
वर्षभरात ३० टक्के रिटर्न
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या धनत्रयोदशीपासून किमती तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर २०२३ रोजी सोन्याचा भाव ६०,७५० रुपयांवरून ८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. केवळ २०२४ मध्ये देशांतर्गत सोन्याच्या किमती २३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. हे शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्यापेक्षाही जास्त आहेत. बेंचमार्क सेन्सेक्स या वर्षी जवळपास ११ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात ८ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 25-10-2024