ST BUS : खेड आगारातून सहलींसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत गाड्या फुल्ल

खेड : खेड आगार शालेय सहलींच्या हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून, गेल्या १५ दिवसांपासून सहलींसाठी विशेष एसटी बसफेऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शालेय संस्था आणि महाविद्यालयांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे दररोज ४ विशेष फेऱ्या चालवल्या जात आहेत. या सर्व फेऱ्या १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे आरक्षित झाल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.

सहलींचा हंगाम सुरू होताच एसटी बसना संस्थांकडून मोठी मागणी येऊ लागली आहे. आगारातून गेल्या १० दिवसांपासून सहलींसाठी विशेष फेऱ्या नियोजनबद्धरीत्या धावत असून, बस उपलब्धता कमी पडू नये यासाठीही विशेष ध्यान देण्यात येत आहे. सहलींच्या फेऱ्यांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. सध्या लग्नसोहळ्यांचा हंगामही सुरू असल्याने, विवाहसोहळ्यांसाठीही
बसफेऱ्यांची मागणी वाढली आहे. या मागणीनुसार, खेड आगाराकडून विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे राजेशिर्के यांनी स्पष्ट केले. शालेय सहलींसोबत लग्न सोहळ्यांसाठीही मागणीनुसार बसेस देण्यात येत आहेत. हंगामभर ही सेवा उपलब्ध राहील, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 29/Nov/2025