रत्नागिरी : क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचे नाव सातत्याने उंचावत असून, आता ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘पंच’ (Referee) म्हणून निवड करण्यात आली आहे. लातूर येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्या पंचाची भूमिका बजावणार आहेत.
लातूरमध्ये रंगणार राज्यस्तरीय स्पर्धा
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३५ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर क्योरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि ११ वी महाराष्ट्र स्टेट सिनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५-२६ यांचा समावेश आहे. ही स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड येथे पार पडणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संकेता सावंत यांची निवड झाल्याने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ईगल अकॅडमीतून घडवतायत खेळाडू
संकेता सावंत या रत्नागिरीतील अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात ‘ईगल तायक्वांदो अकॅडमी’ चालवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुले-मुली या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत असून विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करत आहेत. त्यांच्या याच क्रीडा नैपुण्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत पंचाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
संकेता सावंत यांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा आणि राज्य संघटनेकडून त्यांचे कौतुक होत आहे. राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी संकेता सावंत यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ईगल तायक्वांदो अकॅडमीचा पालक वर्ग आणि क्रीडा प्रेमींनी त्यांना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 03/Dec/2025














