Soham Bandekar & Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर व पूजा बिरारी अडकले लग्नबंधनात

Soham Bandekar & Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर व पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. या दोघांनी लोणावळ्यात लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोहम-पूजाच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो सर्वांसमोर आलेला आहे. पूजा व सोहम आता ‘साता जन्माचे सोबती’ झाले आहेत.

पूजा व सोहमच्या वेडिंग लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाची शाल घेतली आहे. तर, सोहमने देखील पूजाच्या साडीला मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा डिझायनर कुर्ता घातल्याचं त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

मिस्टर अँड मिसेस बांदेकरांच्या हटके लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पूजा-सोहमच्या लग्नासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र फुलांची सजावट, पूजा-सोहमच्या ग्रँड एन्ट्रीसाठी खास स्टेज सजवण्यात आला होता. लेकाच्या लग्नात आदेश व सुचित्रा बांदेकरांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं.

पूजा व सोहमच्या लग्नासाठी अनेक मराठी सेलिब्रिटी लोणावळ्यात पोहोचले आहेत. या दोघांच्या हळदी समारंभात सुकन्या मोने, ऋजुता देशमुख, अभिजीत केळकर, सचित पाटील, सुमीत राघवन, दीपाली विचारे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच पूजाचं ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या सेटवर पार पडलेल्या केळवणात सोहमसाठी खास उखाणा घेतला होता. पूजा उखाणा घेत म्हणाली होती, “घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर… माझे अहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर !”

दरम्यान, सोहम बांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर, पूजाने यापूर्वी ‘स्वाभिमान’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:30 PM 03/Dec/2025