रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जेवणाची थाळी, चहा, पाणी यांचे दर निश्चित केले आहेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाई होणार आहे. व्हेज चाळी ७० रुपये, नॉनव्हेज थाळी १२० रुपये, पोहे १५ रुपये, चहा ८ रुपये असा दर ठेवण्यात आला आहे. एकूण २५२ वस्तूंचे दर ठरवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील दापोली-खेड, गुहागर, चिपळूण संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा राजापूर अशा ५ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मंगळवार २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदान होईपर्यंतचा खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो, उमेदवाराने केलेला खर्च आणि सादर केलेल्या खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाते. यंदा निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाखांची होती यंदा यामध्ये १२ लाखांची वाढ केली आहे. बैठका, सभा, रॅली आणि जाहिराती, पोस्टर्स, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे.
उमेदवाराला प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी चहापान, जेवण, सभा, प्रचारासाठी वाहन, रॅली, जाहिरात आदी बाबींवर खर्च करावा लागतो. हा खर्च निवडणूक आयोगाच्या आधीन राहून करावा लागतो. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो यासाठी उमेदवारा राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडू शकतो.
उमेदवारी अर्ज भरताना खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्या रजिस्टरमध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च, दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य आहे. प्रचारारराठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे दरही ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकी २४ तासांसाठी १ हजार १०० रुपये, रिक्षा १ हजार ३०० रुपये, मारुती स्विप्ट, टाटा इंडिका, ओमनी ३ हजार ३०० रुपये, जीप, टाटा सुमो, बोलेरो, तवेरा ३ हजार ९०० रुपये स्कार्पिओ, इटिंगा, महिंद्रा झायलो ३ हजार ९०० रुपय , वेरणा, होंडा सिटी, फोर्ड आयकॉन, टाटा इडिंगो, स्वीप्ट डिझायर ३ हजार ६०० रुपये, इनोव्हा, क्रेस्टा, फॉरच्युनर ५ हजार १०० रुपये ठरवण्यात आले आहेत. २० माणसांच्या बँड पथकाला प्रतीदिन १० हजार रुपये, ५ माणसाचे पोवाडा पथक ५ हजार रुपये, ३ माणसांचे हलगी पथक १ हजार ५०० रुपये, २० जणांचे झांज पथक १० हजार रुपये, शिंग वादन प्रति व्यक्ती ३०० रुपये, बँजो ग्रुप ४ माणसांचा तीन तासासाठी २ हजार ५०० रुपये, पुष्पगुच्छ मौला २२० रुपये, पुष्पगुच्छ मध्यम १८० रुपये, पुष्पगुच्छ लहान १०० रुपये, हार मोठा ३२५ रुपये, मध्यम २२५ रुपये, लहान १२५ रुपये दर ठरवण्यात आला आहे.
खर्चाचा प्रकार व दर
चहा ८ रुपये, कॉफी १२ रुपये, बिस्कीट पुडा १० रुपये, कोल्ड्रिंक्स २० रुपये, कोकम १५ रुपये, लस्सी १५ रुपये, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी १५ रुपये, वडापाव १० रुपये, इडली २५ रुपये, मिसळ ४० रुपये, सामोसा १५ रुपये, शाकाहारी जेवण ७० रुपये, मांसाहारी जेवण १२० रुपये दर ठरवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 26/Oct/2024














