Harne Bandar | हर्णे बंदरात कोळंबीची आवक घटली

दापोली : लुसलुशीत चव आणि सतत असलेल्या लोकप्रियतेमुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील कोळंबीला नेहमीच भरघोस मागणी असते. आवक वाढली की विक्रीला चालना मिळते आणि पर्यटकांचीही बंदरावर गर्दी वाढते. मात्र मागील गेल्या महिन्याभरापासून कोळंबीची आवक घटल्याने मासळी बाजारात तुटवडा निर्माण झाला असून पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. परिणामी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत कोळंबीची समाधानकारक आवक झाल्याने दर आटोक्यात आले होते. मासळी केंद्रांवर कोळंबी सहज उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या ताटातील चवही वाढली होती. मात्र ही सुधारलेली परिस्थिती फार काळ टिकली नाही. पुन्हा एकदा कोळंबीची आवक घटण्याची चिन्ह दिसू लागल्याने मच्छीमार बांधवांची चिंता आणखीणच वाढली आहे.

विशेषतः नाताळ आणि ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर दापोलीत पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने चिंतेत भर पडली आहे. पर्यटन हंगामात कोळंबीसह सुरमई, पापलेट अशा ताज्या समुद्री मासळीची मागणी प्रचंड वाढते, पण या मासळीची आवक कमी राहिली तर व्यापारावर नक्कीच विपरीत परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 05/Dec/2025