Amey Khopkar on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना, सेलिब्रिटींसह राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (दि. 06) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनात निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar), अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अमेय खोपकर यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाचा धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
तसं झाडांना देखील माफ करा
अमेय खोपकर म्हणाले की, मला लाज वाटत आहे की, सरकारने झाडावर फुल्या मारल्या. हे आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखे आहेत. एकाही झाडाच्या फांदीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात लावू देणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जसं पार्थ पवारला माफ केलंय, तसं झाडांना देखील माफ करा. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे आंदोलन छेडेन. एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.
साधू महंतांचे स्वागत, पण…
अमेय खोपकर पुढे म्हणाले की, एकही झाड तोडू देणार नाही, गिरीश महाजन खोटे बोलत आहेत ते कुठेही गेले नाहीत. साधू महंतांचे स्वागत करतो. पण, उरावर बसून आम्ही कुंभमेळा होवू देणार नाही. हा परिसरात रेसिडेन्शिअल झोन करणार आहेत. बिल्डरच्या घशात ही जागा टाकली जाणार आहे. आम्हाला यात काही राजकीय पोळी भाजायची गरज नाही. जिथे पंधरा हजार झाडे लावणार आहेत. त्या ठिकाणी कुंभमेळा भरवावा, असे देखील त्यांनी म्हटले.
तपोवन वृक्षतोडीविरोधात शिंदे गटही मैदानात
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या विषयावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले तपोवनातील वृक्ष तोडी विरोधात शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 06/Dec/2025














