महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींच्या ११ ते १२ सभा होणार

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही धुरळा उडणार आहे. राज्यात पंतप्रधानांच्या ११ ते १२ सभा होणार असून त्यात नवी मुंबई, गोंदिया, मुंबई, नांदेड, धुळे, अकोला आणि इतरही ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे म्हणाले, “राज्यातील २७७ जागांचा निर्णय झाला असून उर्वरित ११ जागेचा तिढा उद्यापर्यंत (ता. २६) सुटेल.”

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रस्तावित भाजप प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे दिल्लीला रवाना झालेले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार हे संपर्कात आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही.” निवडणुकीच्या या रणधुमाळीत माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मिळालेल्या उमेदवारीवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, नवाब मलिकांबद्दल अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 26/Oct/2024