माझ्याकडे बंदूक नसतानाही मला… संजय दत्तने कशी काढली जेलमधली ५ वर्ष? म्हणाला…..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. कधी हिरो तर कधी व्हिलन अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या. मात्र १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याला अटक करण्यात आली. जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. याप्रकरणी शिक्षा भोगताना त्याला काही वेळेस जामीनही मिळाला, नंतर २०१६ मध्ये त्याची यातून सुटका झाली. संजय दत्तच्या या आयुष्याचा उल्लेख ‘संजू’ या चित्रपटातही करण्यात आला होता. आता अभिनेत्याने नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजयने नुकतीच ‘द हिमांशू मेहता शो’मध्ये हजेरी लावली होती. यामध्ये बोलताना त्याने त्याच्या आयुष्यातला तुरुंगातील काळ सांगितला. तो म्हणाला, ‘माझ्या वडिलांना आणि बहिणींना धमक्या येत होत्या. लोक म्हणत होते की, माझ्याकडे बंदूक आहे. मला आजही कळत नाही की नेमकं काय झालं आणि मला तुरुंगात जावं लागलं. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, २५ वर्षांनी TADA किंवा बॉम्बस्फोट प्रकरणात मी दोषी नाही हे त्यांना समजलं, माझ्याकडे कोणतीच बंदूक नसतानाही मला शस्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवलं; या सगळ्यासाठी २५ वर्ष का लागली ते मला अजून कळलं नाही.

तो पुढे म्हणाला, ‘या घटनेला मी माझ्या आयुष्याचा एक भाग मानतो. यातून मी खूप काही शिकलो. यादरम्यान मी कायद्याची काही पुस्तकं वाचली. मी तुरुंगातील तो काळ सन्मानाने भोगला. तिथे मी खूप वेळ वाचन, प्रार्थना आणि जप केला. ध्यान केलं. शिवपुराण, गणेशपुराण, भगवद्गीता, रामायण, महाभारत – अशी बरीच पुस्तकं मी तिथे वाचली. मला पाच वर्षांनी बाहेर यायचंच होतं. पण तेव्हा माझी फक्त एवढीच विनंती होती की, आदरणीय न्यायाधीशांनी आणि सरकारी वकिलांनी माझा खटला लवकरात लवकर निकाली काढावा, कारण मी तुरुंगात अनेक लोकांना वर्षानुवर्षे तिथे अडकून पडलेलं पाहिलं आहे.’

त्याने यापूर्वी ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ मध्ये तुरुंगात काय काम केलं याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणालेला, ‘मी तिथे काम करून पैसे कमवत होतो. कधी खुर्च्या बनवल्या, कधी कागदी पिशव्या बनवल्या. त्यासाठी मला मजुरी मिळायची. मी तिथे एक रेडिओ स्टेशनही सुरू केलं होतं, त्यासाठीदेखील पैसे मिळायचे. आम्ही कार्यक्रम करत होतो, त्यात चर्चा, विनोद, वादविवाद – सगळं असायचं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 09/Dec/2025