Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाही तर घरी बसावं लागेल…. देवेंद्र फडणवीस आमदाराला सुनावलं

नागपूरः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. महिला अत्याचाराविषयी बोलताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारलं.

त्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अभिमन्यू पवार यांनीही अवैध दारूविक्रीविषयी बोलताना लाडक्या बहिणींचा उल्लेख केल्याने मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी आमदार पवार यांना सुनावल्याचं पाहायला मिळालं.

“आपण लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी म्हणतो पण अवैधरित्या होणारी दारूविक्री हे लाडक्या बहिणींचं सगळ्यात मोठं दुःख आहे. त्यामुळे सरकारला याबाबत काम करावं लागेल. अध्यक्ष महोदय, तुम्ही स्वतः बैठक घेतली. त्यानंतर सूचना देऊनही हे बंद होत नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे,” असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक विषयात लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाही तर घरी बसावं लागेल, अशा इशारा त्यांनी दिला.

विरोधकांचाही समाचार

काही आमदारांनी महिला सुरक्षेबाबत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व विषय लाडक्या बहिणीशी जोडणे चुकीचे आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारली आहे. या योजनेसह महिलांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. निराधार योजनेचे कोणाचेही पैसे रोखले नाही. ज्यांचे केवायसी झाले नाही, केवायसी झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होईल, असंही त्यांनी सांगितलं. शक्ती कायद्यातील काही गोष्टी नवीन तीन कायद्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. कुठलीही समस्या मांडताना आमदार लाडकी बहिणीचा मुद्दे उपस्थित करतात. प्रत्येक गोष्टीत हा मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. ही योजना बंद होणार नाही, सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 10/Dec/2025