रत्नागिरीत अमली पदार्थांवर पोलिसांची करडी नजर; कोकण नगरात ‘एलसीबी’चा छापा, गांजाच्या पुड्या विकणाऱ्याला अटक

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या ‘ड्रग फ्री’ रत्नागिरी मोहिमेला यश

रत्नागिरी | प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कोकण नगर भागात धडक कारवाई करत गांजा विक्रीसाठी उभ्या असलेल्या एका तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत गांजाच्या १३ पुड्या आणि डिजिटल वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयास्पद हालचाल आणि थरारक पाठलाग

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ८ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास कोकण नगर येथील कब्रस्थानच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती हातात कॅरीबॅग घेऊन संशयास्पदरित्या उभी असल्याचे पथकाला दिसले.

पोलिसांची चाहूल लागताच त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या एलसीबीच्या पथकाने त्याला शिताफीने जागीच पकडले. दोन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव रईस सईद खान (वय ३२, रा. कोकण नगर, रत्नागिरी) असल्याचे सांगितले.

पिशवीत सापडल्या गांजाच्या १३ पुड्या

पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये गांजा आढळून आला. विक्रीसाठी सोपे जावे म्हणून त्याने १३ पारदर्शक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये हा गांजा भरला होता.

जप्त मुद्देमाल: २०४ ग्रॅम गांजा (किंमत ६००० रु.), एक डिजिटल वजन काटा (२०० रु.), २ मोबाईल आणि ३५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कामगिरी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.व्ही. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. पथकात यांचा होता समावेश:

स.पो.नि. श्रीमती शबनम मुजावर (प्रभारी अधिकारी, महिला कक्ष)

श्रेणी पो.उनि. श्री. संदीप ओगले

पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. योगेश नार्वेकर, पो.हवा. दिपराज पाटील.

आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ॲक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 11/Dec/2025