रत्नागिरी : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने रत्नागिरी शहर परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील जेलरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित बांधकामासाठी शासनाने १३.५३ कोटी रु. इतकी भरीव रक्कम मंजूर केली आहे.
रत्नागिरी येथे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लवकरच अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे सुरक्षित आणि सुविधाजनक निवासस्थान उपलब्ध होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ९ डिसेंबर २०२५ रोजी शासन आदेशाचे शुद्धीपत्रक जारी केली आहे. या शुद्धीपत्रकानुसार, संदर्भाकित मूळ शासन निर्णय १ जुलै २०२५ मध्ये विहित केलेल्या सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या बांधकामाच्या अत्यंत अंमलबजावणीसाठी महत्त्वाची अट समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या या प्रकल्पाकरिता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र- राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआयडीसी) मुंबई हे काम पाहणार आहे. सुमारे १३.५३ कोटी रु. खर्चाच्या या वसतिगृह इमारतीच्या बांधकामाचा संपूर्ण तांत्रिक, वित्तीय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कार्यभार आता या सक्षम शासकीय संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रत्नागिरीतील शैक्षणिक वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत आहे. नवीन वसतिगृह इमारतीमुळे शहरातील शैक्षणिक सुविधा अधिक बळकट होऊन ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मार्ग सुकर होणार आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 12/Dec/2025













