ग्रामीण भागातही वाढतोय स्तनाचा कर्करोग

चिपळूण : पूर्वी कर्करोग म्हटला की ही शहरी समस्या वाटत होती पण आता ती ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढत चालले आहे. २० ते २२ वयोगटातील तरुण स्त्रिया देखील या आजाराने ग्रस्त झाल्याचे पहायला मिळते. निरोगी वजन राखून, नियमित व्यायाम करून आणि अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन टाळून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

डॉ. तेजल गोरासिया (स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ /ऑन्को सर्जन, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, चिपळूण) सांगतात की, स्तनाग्रातून असामान्य स्त्राव किंवा रक्तस्त्राव आणि स्तनामध्ये अचानक बदल झाला असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. महिलांनी घरच्याघरी स्वतःच स्तन तपासणी करावी तसेच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्या महिलांची प्रसूती झाली असेल त्यांनी आपल्या लहान मुलांना स्तनपान जरूर केले पाहिजे. यामुळेही स्तनाच्या कर्करोगापासून दूर राहता येऊ शकते.

ऑक्टोबर हा महिना पिंक अवेरनेस महिना (स्तन कर्करोग जागरूकता महिना) म्हणून पाळला जातो. बऱ्याच महिला स्वतःहून कर्करोगाची तपासणी करीत नाहीत. त्यामुळे कर्करोगाचे अंतिम टप्प्यातच निदान होते. मात्र, तेव्हा उपचार करणेही अशक्य होते. अशातून कर्करुग्णांची संख्या व मृत्यू दर वाढत आहेत. कॅन्सरतज्ज्ञांच्या मते, घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटातच स्वतःच स्तन तपासणी करता येऊ शकते. यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत होते.

महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण लक्षवेधी
जर एखाद्या स्त्रीचे वय २५ वर्षापेक्षा अधिक असेल आणि तिला स्तनात गाठ जाणवत असेल अथवा स्तनाग्रात बदल जाणवला असेल किंवा स्त्राव होत असेल, तर अशा परिस्थितीत त्वरित कॅन्सरची चाचणी करावी. एक्स-रे मॅमोग्राफी, सीटी आणि पीईटी स्कॅन यासारख्या चाचण्यांद्वारे स्तनामधील दोष शोधले जाऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशभरात साडेबारा लाख नवे कर्करुग्ण आढळून आले आहेत. आठ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. यात महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण लक्षवेधी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 26/Oct/2024