चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची नव्याने इमारत उभी करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चाच्या निधी प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. आमदार निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहातील चर्चेदरम्यान आपण मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला विनंती करीत असून हे प्रश्न सोडविणे हे माझ्यासाठी जनतेचा हक्क आहे, असे सांगून चिपळूणसह संपूर्ण मतदारसंघाच्या मूलभूत सुविधांकरिता आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता व्हावी याकरिता शासनाचे लक्ष वेधले.
प्रामुख्याने चिपळूण शहर हे मुंबई-गोवा महामार्गावर असून कोकणातील वेगाने विकसित होणारे मध्यवर्ती केंद्र आहे. नगर परिषदेच्या स्थापनेला दीडशे वर्षांची परंपरा आहे. औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृती या सर्वच क्षेत्रात प्रगती सुरू आहे. मात्र, दीडशे वर्षांच्या नगर परिषदेच्या गरजांकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. शहरासाठी शासनाने नुकतीच १५३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याच पद्धतीने चिपळूण न.प.च्या जीर्ण झालेल्या इमारीच्या निर्माणासाठी भाग क्र. १ अंतर्गत ३० कोटी रूपये निधीच्या खर्चाला तातडीने शासनाने मंजुरी द्यावी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणच्या सभेत या विषयाबाबत मंजुरीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा. त्याचप्रमाणे पुरापासून शहराचे संरक्षण होण्यासाठी लाल व निळ्या रेषेसंदर्भात पुनर्विचार करावा व शहरातील तळी सुशोभीकरण व अन्य पर्यटनदृष्ट्या विकासकामांना निधी व मंजुरी द्यावी. नाला बांधणी, पूर संरक्षक भिंत अशी कामे पूर्ण झाल्यास शहराला पुरापासून मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात आपण गेली चार वर्षे अधिवेशनात विषय उपस्थित करीत आहेत. त्यानुसार शासनाने या बाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. निकम यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 15/Dec/2025













