चिपळूण : तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे मार्गावरील पूल २३ सप्टेंबर रोजी कोसळल्यानंतर १६ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मार्गावरून रोजंदारी करणारे शेकडो हजारो कामगार, विद्यार्थी, रुग्ण, तसेच औद्योगिक वाहतूक यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून वाढलेल्या अंतरामुळे वाहतूक खर्च आणि दैनंदिन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या मार्गावरील पुलासाठी सुमारे ३२ कोटींची तरतूद झालेली असतानाही काम सुरू न झाल्याने आता २४ डिसेंबर रोजी १६ गावातील ग्रामस्थ व कामगारांसह आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी मुख्य अभियंता एमआयडीसी मुंबई, विभागीय कार्यालय रत्नागिरी-खेर्डी तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन देत पुलांची कामे तत्काळ सुरु करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावरील कोसळलेल्या दोन पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बाधणीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमार्फत कामाची जबाबदारी स्वीकारून एकूण ३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार एमआयडीसीने निविदा ४८/२०२५२६ जाहीर करून प्रक्रिया पूर्ण केली असून कामासाठी कमिटीची औपचारिक मंजुरीही मिळालेली आहे. तरीदेखील प्रत्यक्ष काम अद्याप सुरु झाले नसल्याबद्दल अडरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झालेल्या विलंबामुळे १६ गावांचे दळणवळण विस्कळीत, हजारो नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांचे हाल, औद्योगिक व व्यापारी वाहतुकीची मोठी अडचण, नागरिकांच्या खर्चात वाढ अशा गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दोन्ही पुलांचे काम तत्काळ सुरू न झाल्यास २४ डिसेंबर रोजी खडपोली-वालोटी फाटा येथे १६ गावातील शेकडो ग्रामस्थ व कामगारांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात अडरेकर यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी आणि पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांनाही देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 15/Dec/2025













