चिपळूण : पावसाळ्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभागाकडून वाशिष्ठी नदीत गाळ उपशाला सुरुवात झाली आहे. पेठमाप, गोवळकोटसह फरशी पुलाजवळ गाळउपसा केला जात आहे. पाच पोकलेनच्या साह्याने गाळ उपसा केला जात असून, १० डंपर वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. गाळ उपसा मोहीम धिम्या गतीने सुरू असून या मोहिमेला गती देण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली आहे.
चिपळूण शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले. त्यानंतर वाशिष्ठी आणि दाभोळ खाडीतील गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. चिपळूणकरांच्या साथीने बचाव समितीने बेमुदत उपोषण आंदोलन छेडल्यानंतर गाळ उपशाची मोहीम शासनाकडून हाती घेण्यात आली. त्यासाठी जलसपंदा विभागाने राज्यातील सर्व यंत्रणा चिपळुणातील गाळ उपसा करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे २०२२ मध्ये वाशिष्ठी आणि शिवनदीतून मोठ्या प्रमाणात गाळ उपशाला चालना मिळाली. नाम फाऊंडेशनने देखील गाळ उपशासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. मात्र, गेल्या एक दोन वर्षात प्रभावीपणे गाळ उपशाला चालना मिळू शकली नाही. चिपळूण येथे जलसंपदा विभागाची आलेली यंत्रणा पुढील वर्षी राज्यातील विविध विभागात नेण्यात आली. परिणामी ४ ते ५ पोकलेनवर येथील काम मुरु राहिले आहे.
वाशिष्ठी नदीतील मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाल्याने आणि नलवाडे बंधारा बांधल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील चिपळूण शहराला यावर्षी पुराचा तडाखा बसला नाही. गेल्या चार वर्षात गाळ उपसा मोहिमेचे सकारात्मक परिणाम जाणवले आहेत, त्यामुळे सातत्याने वाशिष्ठीतील गाळ उपसाची मागणी केली जात आहे.
यावर्षी पावसाळा उपशाला उशिरा सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाशिष्ठी नदीत ५ पोकलेन व १० डंपरच्या साह्याने गाळ उपसा केला जात आहे. उपसा केलेला गाळ शासकीय जागेत टाकण्यात येत आहे. पेठमाप, गोवळकोट, नाईक कंपनी, फरशीपूल आदी ठिकाणी गाळ उपसा सुरू आहे. सध्याची ही मोहीम धिम्या गतीने सुरू असल्याने त्यास प्रशासनाने गती द्यावी, चिपळूणवासीयांना पुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही चिपळूण बचाव समितीकडून देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 15/Dec/2025













