Ratnagiri : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ७.५२ कोटींची तडजोड

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय, रत्नागिरी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये चौथ्या राष्ट्रीय लोकअदालतचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रभारी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विनोद वाय. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या लोकअदालतचे उ‌द्घाटन झाले.

या लोकअदालतमध्ये जिल्ह्याभरातील ४,६८६ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १६,९५९ वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. वकीलवर्ग आणि पक्षकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकूण ४,७३७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. या तडजोडीतून विक्रमी ७,५२,२४,५४५/- (सात कोटी बावन लाख चोवीस हजार पाचशे पंचेचाळीस रुपये मात्र) एवढ्या रक्कमेचा निपटारा करण्यात आला. सदर लोकअदालतमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधित खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणात नगरपालिका, ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बँका, पतसंस्थांचे कर्ज थकीत वीज व टेलिफोन बिले इत्यादी प्रकरणांमध्ये यशस्वीपणे तडजोड झाली. सदरचे लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव श्री. आर. आर. पाटील व कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:19 PM 15/Dec/2025