कोकण विभागीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन

राजापूर : मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त, धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे तालुक्यातील माडबन गावचे ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गवाणकर फॅन क्लब व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारी असून, सात जिल्ह्यांतील कलावंतांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांसाठी खुली असून, या सर्व भागांतील हौशी व व्यावसायिक रंगकर्मी, नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची जिल्हावार तारीख, स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ३ जानेवारी संपर्क रमण वायंगणकर, हेमंत करगुटकर, रत्नागिरी जिल्हा ४ जानेवारी, संपर्क राजीव कीर, नंदू गवाणकर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा १० व ११ जानेवारी संपर्क दशरथ कीर, समीर चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर व मुख्य सचिव प्रकाश कांबळी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 15/Dec/2025