खेड : तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्पाची फाईल मागील अनेक महिन्यांपासून विभागीय कार्यालयात प्रलंबित असल्याने प्रकल्पाला गती मिळत नाही. धरण प्रकल्पामुळे परिसरातील पाणीसाठा वाढून ग्रामस्थांना मोठा लाभ होणार असताना, प्रशासकीय विलंबामुळे काम रखडत असल्याने २१ डिसेंबर रोजी प्रकल्प स्थळी सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती किंजळे तर्फे नातू ग्रामस्थ नितीन जाधव यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना जाधव म्हणाले, धरण प्रकल्पासाठी आवश्यक कागदपत्रांची फाईल पुढे सरकावी यासाठी स्थानिक आमदारांसह ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
मात्र, फाईलला अंतिम निर्णय मिळत नसल्याने प्रकल्प थांबलेलाच आहे. यामुळे भविष्यातील पाणीसाठा, सिंचन क्षेत्र आणि स्थानिक विकासावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाची फाईल कुठे अडली आहे आणि तिच्या विलंबाचे खरे कारण काय, हे स्पष्ट न होताच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि प्रशासनाकडून उत्तर मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी २१ रोजी सकाळी ९ वा. जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही सभा प्रस्तावित धरण परिसरात होणार असल्याचे नितीन जाधव यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 15/Dec/2025













