खेड : खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भरणे नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने या चर्चावर शिक्कामोर्तब झाले आहे. या घटनेनंतर भरणे नाका आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरातून एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ही घटना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचेही ऐकावयास मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील गवळवाडी परिसरात हा बिबट्या दिसल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे भरणे नाका परिसरात या घटनेच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत.
महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर नातू नगर धरणाचे पाणी कालव्याद्वारे नेण्यात आले असून, या कालव्यालगतच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. गवळवाडी परिसरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वनविभागाचे कार्यालय तसेच वनविभागाची तपासणी नाका असतानाही या घटनेची अद्याप वनविभागाला ठोस माहिती नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार खेड तालुक्यात कार्यरत असलेले वनविभागाचे अधिकारी पत्रकार तसेच लोकप्रतिनिधी यांचे फोन उचलत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांनी संपर्क साधल्यास तर फोन उचलण्याचाच प्रश्नच निर्माण होत नसल्याने आता सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची माहिती वनविभागापर्यंत पोहोचली नसावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
‘आम्ही म्हणजे राजा आणि तुम्ही म्हणजे प्रजा’ अशा अविर्भावात वावरणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस उपाययोजना करण्यात येणार का? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. नागरिकांनी तातडीने वनविभागाने दखल घेऊन पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 15/Dec/2025












