खेड नगरपरिषद, पशुवैद्यकीय रुग्णालय राबवणार कुत्रे निर्बीजीकरण मोहीम

खेड : शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोक्याच्या ठिकाणी येणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीमुळे पालकही भयग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी नगरपरिषद व पशुवैद्यकीय रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांच्या उच्छादाने नागरिक मेटाकुटीस आले आहेत.

मोक्याच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. मोकाट कुत्र्यांमुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही. भटक्या कुत्र्यांसंदर्भात वेळोवळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने येथील नगर प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी पुढे सरसावले आहे. नगर परिषद व पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वच्छता निरीक्षक अक्षय लोहार यांच्या देखरेखीखाली मोहीम राबवणार आहे.

यासंबंधी तक्रारीसाठी हेल्पनाईन व्यवस्था केली आहे. नगरपरिषद हद्दीतील जागांची निश्चितीही करण्यात आली. शहरातील दापोली नाका नदीकिनारी, चिपळूण देवणा रोड, कचरा डेपो (समर्थनगर), नाका, सिनेमागृह मागे, बस आगारासमोर व सोसायटीच्या मोकळ्या भूखंडात, कुवारसाई स्मशानभूमी परिसरात भटक्या कुत्र्यांना खाद्य खाण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 15/Dec/2025