चिपळूण : महाबळेश्वर येथे आयोजित सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणचे सायकलपटू प्रशांत संभाजी दाभोळकर यांनी दमदार कामगिरी साकारत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक मिळवला, तर सहकारी एस. आर. अंकुश जंगम यांनी ओपन कॅटेगरीत अकरावा क्रमांक पटकावला.
देशभरातून तब्बल २०० स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या शर्यतीत केलघर (१७ किमी), आंबेनळी (३२ किमी), तापोला (२५ किमी) आणि पुन्हा केलघर (१७ किमी) अशा एकूण चार कठीण घाटांचा समावेश होता. या चढायांचे एकत्रित ३००० मीटर एलेवेशन स्पर्धेला अत्यंत आव्हानात्मक बनवत होते.
स्पर्धेची सुरुवात पहाटे ५.३० वाजता पहिल्या केलघर घाटापासून झाली. निर्धारित १ तास ३० मिनिटांच्या कटऑफ वेळेपेक्षा कमी म्हणजेच १ तास ०८ मिनिटे ५० सेकंदांत प्रशांत आणि अंकुश यांनी हा टप्पा पूर्ण केला. त्यानंतरच्या आंबेनळी घाटाच्या ३२ किमी चढाईचा कटऑफ ३ तास १५ मिनिटांचा असताना त्यांनी हा घाट केवळ २ तास २९ मिनिटे ४८ सेकंदांत पार केला. तापोला घाटाची २५ किमीची चढाई त्यांनी दुपारी २ वाजता सुरू करून १ तास ४० मिनिटांत पूर्ण केली. केलघर घाटाचा दुसरा टप्पा त्यांनी १ तास १४ मिनिटे १४ सेकंदांत पूर्ण केला.
आठ तास ४५ मिनिटांची एकूण वेळ मर्यादा असलेल्या या स्पर्धेत प्रशांत दाभोळकर यांनी सर्व टप्पे मिळून फक्त ६ तास ३२ मिनिटे ५२ सेकंदांत संपूर्ण रेस पूर्ण करत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक पटकावला आणि फिनिशर मेडल प्राप्त केले. अंकुश जंगम यांनीही ६ तास ४३ मिनिटे ४६ सेकंदांत रेस पूर्ण करून ओपन कॅटेगरीत अकरावा क्रमांक मिळवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 15/Dec/2025












