लांजा : लांजा तालुक्यात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अमोल रंगयात्री या नाट्य संस्थेने रत्नागिरी येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत आपला पुन्हा एकदा ठसा उमटवला. स्पर्धेच्या अंतिम क्षणी सादर झालेल्या नाटकाला हाऊसफुल्लचा प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘ईठ्ठला’ या नाट्य कलाकृतीने द्वितीय क्रमांक पटकावला. यामुळे या नाटकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लांजा तालुक्यातील अमोल रंगयात्री या नाट्य संस्थेने सादर केलेल्या या नाट्यकलेला परीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. अमोल रेडीज यांनी लेखन केलेल्या ईठ्ठला नाटकाने दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही प्राप्त केले, तर नेपथ्य प्रकारात संदीप सावंत यांनी द्वितीय, प्रकाश योजना दयानंद चव्हाण यांनी द्वितीय, तर रंगभूषा गजानन पांचाळ, वेशभूषा संतोष डोर्लेकर द्वितीय, तर संगीत दिग्दर्शनासाठी प्रदीप कांबळे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यासह प्रमुख भूमिका साकारणारे अमोल मारुती रेडीज आणि अर्चना पेणकर-पांचाळ यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या नाटकाची राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
काहीवर्षांपूर्वी याच नाट्य संस्थेच्या जिहाद नाटकाला मानांकनही प्राप्त झाले आहे. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या राज्य नाट्य संस्थेच्या रत्नागिरी केंद्रात अमोल रंगायत्रीच्या ईठ्ठला या नव्या नाट्य कलाकृतीने मजल मारली आहे. ईठ्ठला नाटकाला द्वितीय क्रमांक प्राप्त होताच जिल्हाभरातून अमोल रंगयात्रीच्या नाट्य कलावंत व संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 15/Dec/2025












