रत्नागिरी : आंबिया बहारातील आंबा, काजू फळपीक विमा योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून, तब्बल २१ कोटी ८४ लाख रुपये विमा हप्त्यापोटी भरले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ हजार ९५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाल्यास त्यांच्या फळपिकांना विमाकवचद्वारे भरपाई मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ८३ महसूल मंडलातील आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जात आहे.
यंदा हंगामला उशीर होणार असून मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांची चिंता वाढली होती. १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत किमान तापमान, कमाल तापमान, वेगवान वारा, अवकाळी पाऊस या हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानापोटी बागायतदारांना भरपाई मिळणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवण्याची मुदत होती. त्याला गत वर्षांएवढाच प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये २६ हजार २१२ कर्जदार आणि १० हजार ७६ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी १८ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवलेला आहे.
गतवर्षी ३२ हजार बागायतदारांना लाभ
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानापोटी १०० कोटींचा लाभांश ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता. पंरतु, परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्ती करण्यात आली होती. पुढील वेळी परताव्याची रक्कम वेळेत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 15/Dec/2025












