Weather News | थंडीची लाट ओसरली, तरी राज्यभरात आणखी काही काळ गारठा राहणार​

Maharashtra Weather News : मध्य भारत, महाराष्ट्र आणि अगदी दक्षिण भारतापर्यंत उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळाला. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यामध्येसुद्धा सर्वदूर थंडीचच चित्र पाहायला मिळालं.

किमान तापमानात सातत्यानं होणारी घट पाहता पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी अनेकांनीच स्वेटर, कानटोप्या वापरण्यास सुरुवात केली. उलटपक्षी दुपारच्या वेळी मात्र तीव्र सूर्यकिरणांनी अनेक भागांमध्ये नागरिकांची होरपळ झाली. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्ये ही होरपळ तुलनेनं अधिक असेल. मात्र राज्याच्या काही भागांमध्ये गारठा कायम असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या 24 तासांमध्ये नेमकं काय घडणार?

उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी महाराष्ट्रासह मुंबईवर कोणत्याही अडथळ्याशिवाय आदळल्या आणि त्याचे थेट परिणामही किमान तापमानाच्या स्वरुपात दिसून आले. मात्र आता या वाऱ्याच्या वाटचालीत खंड पडला असून, त्यामुळं मुंबईच्या किमान तापमानाच किंचित वाढ झाली आहे. पहाटेचा गारठा मात्र कायम आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्येसुद्धा थंडीच्या लाटेची तीव्रता कमी असली तरीही गारठा मात्र तग धरून असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात प्रामुख्यानं पुढील 24 तासांमध्ये तापमानात चढ- उतार अपेक्षित असून गारठा कायम राहील मात्र थंडीच्या लाटेचा इशारा नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

का कमी झाला थंड वाऱ्यांचा वेग ?

उत्तर भारतातील पट्ट्यामध्ये सध्या नव्यानं निर्माण झालेल्या पश्चिमी झंझावातामुळं (वेस्टर्न डिस्टर्बन्स) उत्तरेकडून देशाच्या दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिण-पूर्वेकडून मुंबईसह राज्याकडे वारे वाहत आहेत. या बदलत्या प्रणालीचा परिणाम थंडीचा कडाका कमी होण्यात दिसत आहे.

पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून त्यामुळं एकेरी अंदांवरील किमान तापमानाचा आकडा दोन अंकी दिसू शकतो. दरम्यान, बुधवारनंतर (17 डिसेंबरनंतर) बुधवारनंतर या हवामान बदलांना ब्रेक लागणार असून, पुन्हा एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे या शीतलहरी वाहण्यास सुरुवात होईल ज्यामुळं तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. थोडक्यात थंडी सध्या अल्पशा विश्रांतीवर असली तरीही ती दीर्घकालीन सुट्टीवर नाही, ज्यामुळं आठवडा अखेरीस पुन्हा थंडीचा कडाका वाढेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आल आहे.

देशातील हवामान अंदाज काय सुचवतो?

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्ये तामापनात घट अपेक्षित असली तरीही इथं डोंगराळ क्षेत्र वगळता मैदानी भागांमध्ये मात्र किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तर, काही भागांना हिमवर्षावाची अद्यापही प्रतीक्षा आहे. देशाच्या विविध दिशांना विविध हवामानस्थिती गिसून येत आहे. कुठं धुक्यानं प्रवास सेवा विस्कळीत केल्या आहेत, तर तेलंगणा, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगालसारख्या भागांमध्ये तापमानात किंतिच वाढ नोंदवण्यात आली आहे.केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 17 डिसेंबरच्या रात्री एक पश्चिमी झंझावात हिमालयीन क्षेत्रामध्ये प्रवेश करेल, मात्र त्याची तीव्रता कमी असेल.

याच्या प्रभावामुळं जम्मू काश्मीर आणि लडाख इथं 18 ते 21 डिसेंबरपर्यंत हलकी हिमवृष्टीसुद्धा होऊ शकते. तर, पुढच्या 24 तासांमध्ये उत्तराखंडच्या बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसू शकतो. दक्षिण भारतसुद्धा पावसाला अपवाद ठरणार नसून 16 आणि 17 डिसेंबरसाठी तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल इथं विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:41 AM 16/Dec/2025