BMC Election: राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणुकीची तारीख सांगितली आहे. 15 जानेवारीला मतदान होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल लागेल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश आहेत.
दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडली तरीही निवडणुका घ्याव्यात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कोणासोबत लढणार? या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगावर टीका
काही दिवसांपुर्वी बोलताना वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. आयोगाची धुतराष्ट्राशी तुलना करून टीका केली. त्या म्हणाल्या की, मतचोरी उघड होत असतानाही आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. राहुल गांधींनी पुराव्यासह मतचोरी उघड केली आहे. 2019 ते 2024 मध्ये 39 लाख मतदार वाढले, पण 2024 च्या पाच महिन्यांत 32 लाख वाढणे संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीवर काय म्हणाल्या?
आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची भूमिका राहणार आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकटीच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप सरकार ‘एक देश, एक निवडणूक’चा नारा देत असले तरी बिहार, झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत. जर एकत्र झाल्या असत्या तर निकाल वेगळे असते, असे गायकवाड म्हणाल्या. बिहारमध्ये SIR प्रक्रिया राबवली, पण महाराष्ट्राला वगळले, यामुळे निवडणूक प्रक्रिया थट्टेची बनली आहे. राहुल गांधींनी कोरोना, नोटबंदी आणि हवाई क्षेत्रातील धोक्याबाबत आधीच सांगितले होते, पण सरकारने दुर्लक्ष केले आणि देशाला त्रास सहन करावा लागला. आता मतचोरीबाबतही तेच होत आहे. रुपया आणि निवडणूक आयोग यांच्यात अवमूल्यनाची स्पर्धा सुरू असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मनसेच्या युतीला विरोध
काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यास पूर्वी विरोध दाखवला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा असतानाही काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतलाय. आगामी स्थानिक निवडणुकीत मनसे आणि आघाडी एकत्र लढतील का, याबाबत उत्सुकता आहे.
पालिका निवडणूक कार्यक्रम
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा कालावधी असेल. यानंतर 31 डिसेंबरपर्यंत अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असेल. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी 3 जानेवारी 2026 ही देण्यात आलीय. पालिका निवडणूक मतदान 15 जानेवारी 2026 रोजी तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
आरक्षण ओलांडलेल्या दोन पालिकांचं काय?
नागपूर आणि चंद्रपूर, या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी 50 टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क होता. मात्र निवडणूक आयुक्तांनी हे तर्क फेटाळलं. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही. ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालदेखील जाहीर करता येईल; पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि 50 टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 16/Dec/2025













