Manoj Jarange Patil : नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी २२ डिसेंबरला होणाऱ्या मोर्चाला मनोज जरांगे यांचा पाठिंबा…

Navi Mumbai International Airport : : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. परंतू, सरकारडून याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनी येत्या २२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येते आहे. भूमिपुत्रांच्या या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान येत्या २२ डिसेंबरला होणाऱ्या भूमिपुत्रांच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच ‘हा लढा न्यायाचा आणि हक्कांचा आहे. या संपूर्ण आंदोलनाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाच्या नामकरणावरुन अनेक वाद, आंदोलने मोर्चा झाले. या विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भूमिपूत्र सुरुवाती पासून आग्रही आहेत. तसेच काही राजकीय नेते देखील या नावासाठी आग्रही आहेत. परंतू, या विमानतळावरुन उड्डाण सेवा सुरु झाली तरी, अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय प्रलंबितच आहे.

त्यामुळे लवकरात लवकर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी येत्या २२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चा विषयी तसेच भूमिपुत्रांच्या अनेक प्रश्नांसाठी सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिपुत्रांच्या मोर्चाला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.

स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी कोकणातील शेतकरी, भूमिपुत्र आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्याचा सन्मान होणे ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. या मागणीसाठी येत्या २२ तारखेला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा अधिक बळकट करावा, असे आवाहन खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 17/Dec/2025