रत्नागिरी : “प्रशासन गांव की ओर” सुशासन सप्ताह २०२५ अंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये २० ते २४ डिसेंबर या कालावधी जनजागृती कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्व लाभार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत प्रतिनिधी व इच्छुकांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
भारत सरकारच्या निर्देशानुसार ‘प्रशासन गांव की ओर’ अंतर्गत समिती स्तरावर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व विविध योजनांचा लाभ तसेच सेवा पुरविण्यासाठी १९ ते २५ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह २०२५ राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत तालुकास्तरावर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी कार्यालयामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हाभरात होणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये अनुसूचित जाती घटकासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण सहाय्य, आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व इतर कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया, अटी-शर्ती व तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उद्या (२३ डिसेंबर) रोजी सकाळी खेड तालुक्यासाठी ले. पद्मश्री एस. एम. अण्णासाहेब बेहरे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, दापोली तालुक्यासाठी दापोली सिनीअर अर्बन कॉलेज आणि गुहागरसाठी व्हीपीएम महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळा होईल.
२४ डिसेंबर रोजी चिपळूण तालुक्यासाठी डीबीजे महाविद्यालय आणि लांजा तालुक्यासाठी तुकाराम पुंडलिक शेट्ये क. महाविद्यालय येथे सकाळी ११ वाजता, तर राजापूर तालुक्यासाठी दुपारी २ वाजता गाडे दाते क. महाविद्यालय येथे कार्यशाळा घेण्यात येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 PM 22/Dec/2025













