चिपळूण : सावर्डे परिसरात उघडकीस आलेल्या घटना विचारात घेता आंतरराष्ट्रीय दहशतवाद आता चिपळूणच्या वेशीवर दाखल झाला का? अशी शंका घेण्यास जागा आहे. काही स्थानिक तरुण वेगवेगळ्या आमिषांना भुलून दहशतवादाकडे वळताना दिसत आहेत. सावर्डेच्या दृष्टिकोनातून ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. हा दहशतवाद चिपळूणच्या भूमी वाढण्यापूर्वीच त्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे.
कर्नाटकातून खैराच्या लाकडाची कोकणमार्गे तस्करी करणाऱ्या सहाजणांच्या टोळीला नवी मुंबई एटीएस पथकाने सावर्डे या गावातून नुकतीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी एका तस्करांचे थेट इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे व त्याने दहशतवादी संघटनेस आर्थिक मदत पुरवल्याचा संशय असल्याने तपास यंत्रणांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. हे सहा तरुण सध्या मुंबई एटीएसच्या ताब्यात आहेत. खैराच्या तस्करीतून मिळणारा पैसा इसिसला पुरवला जात होता, असा संशय तपास यंत्रणांना आहे. वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन (भिवंडी, जि. ठाणे), असिफ रशिद शेख (नाशिक), फारूख शेरखान पठाण (नाशिक), शाहनवाज प्यारेजन (कर्नाटक), इरशाद शेख (संगमनेर, अहमदनगर), मुआज रियाज पाटणकर (सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या अटक केलेल्या सहा संशयितापैकी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन हा इसिसचा अटकेत असलेला संशयित दहशतवादी साकीब नाचण याच्याशी जवळीक असलेला आहे. साकीब यास भिवंडी तालुक्यातील पडघा येथून एटीएस पथकाने २०२३ मध्ये अटक केलेली असून, त्याच्यावर इसिसला आर्थिक पुरवठा केल्याचा आरोप आहे. सावर्डे येथून अटक केलेल्या वसीम अखतर मोमीन खैराच्या लाकडाचा तस्कर असून, तस्करीतून मिळालेला पैसा तो देशविघातक कृत्ये करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याचा संशय त्याच्यावर आहे. पडघा गावातून इसिसशी संबंधित चार संशयितांना मागील वर्षी एनआयएने अटक केली होती. पुणे, मुंबई, संभाजीनगर येथून देखील काहीजणांना राष्ट्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व तरुण इसिसशी इंटरनेटच्या माध्यमातून जुळले होते, असे तपासातून समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवाद आता चिपळूणच्या वेशीवर दाखल झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. तो पोलिसांनी थांबवला पाहिजे यासाठी आम्ही पोलिसांना निवेदन दिले आहे. स्थानिक पोलिसांना कोणावर संशय असेल तर त्यांनी तत्काळ त्याला अटक करून योग्य तो तपास केला पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष भाजप
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 26/Oct/2024














