Vijay Wadettiwar: मुंबई वाचवण्यासाठी लढले पाहिजे, ठाकरे बंधूंच्या युतीचे स्वागत – विजय वडेट्टीवार

नागपूर : महाराष्ट्रावर, मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे. मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती,मनसे बाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती अस वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडी होती,विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती.पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही,आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला अस मानण्याचे कारण नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 24-12-2025