Kisan Credit Card : किसान कार्डसाठी दर शुक्रवारी रत्नागिरी पंचायत समितीत शिबिर

रत्नागिरी : पशुसंवर्धनविषयक किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी रत्नागिरी तालुकास्तरावर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात सकाळी १० ते सायं ५ वा. या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गट विकास अधिकारी चेतन शेळके व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे (फोटो २, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, ७/१२ व ८ अ उतारा, असेसमेंट उतारा ग्रा. पं. नमुना नं. ८, बँक पासबुक झेरॉक्स, पशुधन असल्याचा दाखला, पॅन कार्ड झेरॉक्स इ.) घेवून पंचायत समिती येथे उपस्थित राहावे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.

केंद्र शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धनविषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय करीत असलेल्या पशुपालकांकडे स्वतःची किंवा भाडेतत्त्वावरील गोठा/शेड आवश्यक आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरिता लागणारा भांडवली खर्च उदा. खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजुरी, पाणी, वीज, चारा लागवडीसाठी येणारा खर्च इ. साठी कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे. कॅश क्रेडीट २ लाखापर्यंत ७% व्याजाने व २ लाखावरील कर्ज ११ % कर्ज स्वरूपात पशुपालकास उपलब्ध होणार आहे. या कर्जाची परतफेड विहित मुदतीत व नियमित झाल्यास नाबार्डकडून ३% पर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 31/Dec/2025