Maharashtra Weather Update: नवीन वर्षात पाऊल ठेवताच मुंबईकरांना सरप्राईज मिळालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिवाळ्याचा जोर वाढत असल्याचं चित्र असताना मुंबईत काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे.
अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकर गोंधळून गेले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून काही ठिकाणी तापमान थेट 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं आहे. (Weather Update)अधिकृतरीत्या थंडीची लाट जाहीर करण्यात आलेली नसली, तरी तापमानातील घसरणीमुळे सकाळनंतर-संध्याकाळी गारठा अधिक जाणवत आहे.
मुंबई, कोकण आणि किनारी भागांमध्ये रात्री व पहाटे थंड वारे वाहत असून थंडीची चाहूल लागली आहे. मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा ताप वाढल्याने तापमान चढते आणि उष्णता जाणवते. त्यामुळे दिवसा-रात्रीच्या तापमानात मोठा फरक दिसून येत आहे.
पारा घसरला, पुढील 4 दिवस महाराष्ट्र गारणार
राज्यातील विविध भागांतील तापमानाची नोंद पाहिली असता, मराठवाड्यातील परभणी येथे सर्वात कमी म्हणजे 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे किमान तापमान 7 अंशांवर पोहोचलं, तर अहिल्यानगरमध्ये 7.5 आणि निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असून किमान तापमान 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहू शकतं.
भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील चार दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, अनेक भागांमध्ये सकाळच्या वेळेत दाट धुकं पडत असल्याने दृश्यमानता कमी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ मराठवाड्यात शीतलहरी
दरम्यान, डिसेंबर महिन्यात विदर्भात थंडीचा विक्रम पाहायला मिळत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक थंड हिवाळ्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. यंदा डिसेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्याची नोंद झाली आहे. मोसमातील सर्वात थंड दिवसांची नोंदही याच महिन्यात झाली आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या नागपूरकरांसाठी बुधवारचा दिवस विशेष गारठ्याचा ठरला. शहरात किमान तापमान 8.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं, ज्यामुळे नागपूर हे विदर्भातील सर्वात थंड ठिकाण ठरलं. याआधी हवामान विभागाने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सरासरी तापमान सामान्यापेक्षा कमी राहील आणि शीतलहरींच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. सध्याची परिस्थिती पाहता हा अंदाज प्रत्यक्षात उतरल्याचं दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 01-01-2026













