देवरूख : देवरूख येथे झालेल्या ५३ व्या रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘कॅश्युरोलोरा’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. स्पंदन धामणे आणि अर्णव परकाले यांनी हे मॉडेल सादर केले होते. स्पंदन धामणे याच्या विज्ञान मॉडेलची राज्यस्तरासाठी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, न्यू इंग्लिश स्कूल देवरूख, काकासाहेब सप्रे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय देवरूख यांच्यावतीने हे विज्ञान प्रदर्शन झाले. ‘कॅश्युशेलोरा’ या प्रकल्पाला ६ वी ते ८ वी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या प्रकल्पासाठी शर्वरी धामणे, प्रसाद सावंत, ओंकार काष्ट, राहुल चव्हाण, रिया पवार, गौरव आंब्रे, शुभम मुद्राळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व विज्ञान शिक्षकांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी स्पंदनचे वडील डॉ. गौरव धामणे, मीना कोळपे, वैभव बुर्री यांचे सहकार्य लाभले. रोटरी प्रतिष्ठान खेडचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळा पर्यवेक्षक शैलेश देवळेकर, राहुल गाडबैल, तेजश्री कानडे, पृथा वडके यांनी स्पंदन आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
काजू टरफलांचा सदुपयोग, महिलांना रोजगार
कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. काजूगर काढल्यानंतर उरलेली टरफले फेकून दिली जातात. या टरफलांचे तेल काढून त्याचा उपयोग विविध ठिकाणी व शेतीसाठीही करू शकतो. काजूच्या टरफलांचे महत्त्व ‘कॅश्युशेलोरा’ या मॉडेलद्वारे मांडण्यात आले होते. हे यंत्र महिला बचत गटाला दिल्यास महिला त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. घरगुती कामे सांभाळून त्या या यंत्राद्वारे स्वयंसिद्धा बनू शकतात. सौर ऊर्जेवर हे उपकरण कार्य करते, असे स्पष्टीकरण या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनावेळी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 01/Jan/2026














