खेड : दहिंबे (ता. मंडणगड) येथील आदिवासीवाडीत २२ मे २०१८ रोजी घडलेल्या खून प्रकरणात तब्बल सात वर्षांनंतर खेड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ यांनी सहा आरोपी महिलांची निर्दोष मुक्तता केली आहे.
मयत रेखा लक्ष्मण मुकना हिच्या मृत्यूप्रकरणी तिची मुलगी निशा नितीन मोरे हिने मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ संगीता शांताराम जाधव हिच्या पतीशी मयत रेखा मुकना यांचे अनैतिक संबंध असल्याचा गैरसमज करून आरोपींनी संगनमताने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भा.दं. वि.
कलम ३०२, ४५२, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, साक्षीदारांच्या जबाबात गंभीर विसंगती आढळून आल्या. आरोपींच्या वतीने अॅड. अश्विन शाहू भोसले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. या खटल्याच्या कामकाजात अॅड. सिद्धी खेडेकर, अॅड. प्रीती भेकरे व अॅड. अंकिता गमरे यांनी सहकार्य केले. या निकालामुळे सात वर्षे सुरू असलेल्या खटल्याचा शेवट झाला असून, न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीपुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 05/Jan/2026














