सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणगंगा आणली : डॉ. पाटील

पाचल : महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून ओळखले जाते, ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळेच. शिक्षणाविषयी जागृती नसणाऱ्या कालखंडात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व या उभयंतांनी जाणले होते. स्त्री शिकली तर समाज सुशिक्षित होईल ही त्यांची धारणा होती, असे प्रतिपादन डॉ. ए. डी. पाटील यांनी केले.

मनोहर हरी खापणे महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे आयोजित जयंती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध झुगारून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धाडस दाखवले. शिकवणारी स्त्री शिक्षिकाच असेल तर विद्यार्थिनी येण्याचे साहस करतील, त्यांना धैर्य देता येईल, त्यांच्या समस्या समजतील. या विचारातूनच त्या स्वतः सुशिक्षित होऊन मुलींना शिकवू लागल्या. आज स्त्री शिक्षणाचा झालेला प्रसार आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारी स्त्री ही सावित्रीबाईंची कामगिरी आहे.

यावेळी डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. एस. एस. धोंगडे, प्रा. एस. जी. चव्हाण, स्नेहा कोलते आदी होते. प्रास्ताविक डॉ. बी. टी. दाभाडे, सूत्रसंचालन प्रा. एस. जी. चव्हाण, आभार प्रदर्शन प्रा. पी. के. कांबळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 06/Jan/2026