Lokshahi Din, Ratnagiri: प्रलंबित अर्ज तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना

रत्नागिरी : ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत ते तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी सोमवारी आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमावेळी दिले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, अन्न व औषधचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जाचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जाबाबत काय कार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. मागील प्रलंबित अर्जाची संबंधित विभागाने निर्गती करावी, असे अप्पर जिल्हाधिकारी गलांडे म्हणाले.

आजच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय जात कार्यालय, प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, रत्नागिरी प्रांत कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील प्रत्येकी १ असे एकूण ७ अर्ज दाखल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 06/Jan/2026