रत्नागिरी : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ४थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ७वीत प्रविष्ठ होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर ३० डिसेंबर २०२५ पासून उपलब्ध केलेले आहे. ही परीक्षा २६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी घेण्यात येईल.
या परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती संकेतस्थळावरील अधिसूचनेत नमूद केलेली आहे. अधिसूचनेतील प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे. सुधारीत शासन निर्णयानुसार पूर्वी ५ वी व ८ वीसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता ४ थी व ७ वीसाठी घेतली जाणार आहे. २०२५-२६ हे संक्रमण वर्ष असेल, ज्यात जुन्या (५ वी व ८ वी) आणि नवीन (४थी व ७वी) दोन्ही इयत्तांच्या परीक्षा होतील. ४थीसाठी शिष्यवृत्तीची दरमहा ५००, ७ वीसाठी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा ७५० तीन वर्षांसाठी असेल. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू, कन्नड या माध्यमांमध्ये देण्यात येऊ शकते.
बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये, तर मागासवर्गीय /दिव्यांगांसाठी १२५ रुपये परीक्षा शुल्क असेल. प्रत्येक शाळेला २०० रुपये शाळा नोंदणी शुल्क भरावे लागेल. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शासनमान्य (सरकारी / अनुदानित /खासगी शाळेत इ. ४ थी किंवा ७वीमध्ये शिकत असावा, ४ थीसाठी कमाल १० वर्षे (दिव्यांगांसाठी १४ वर्षे), ७ वीसाठी १३ वर्षे (दिव्यांगांसाठी १७ वर्षे) वयोमर्यादा असेल. प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. सीबीएसई किंवा आयसीएसई अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येतील, पण त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 06/Jan/2026














