देवरुख : शहरातील आठल्ये सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एम. एस्सी. व टी.वाय. बी.एस्सी. (रसायनशास्त्र) विभागाच्या विद्यार्थ्यांनी फायटो फार्मा लि. कोल्हापूर, घरडा केमिकल, एक्सेल कंपनी लोटे-परशुराम या उद्योगांमध्ये १५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) नुसार पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुभव देणे, तांत्रिक कौशल्यांचा विकास साधणे आणि रोजगार क्षमतेत वाढ घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना रासायनिक उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज, विविध विभागांची कार्यपद्धती, औद्योगिक सुरक्षा नियम, आधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांची हाताळणी तसेच उत्पादन आणि संशोधन प्रक्रियेची सखोल ओळख झाली. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सागर संकपाळ, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, प्रा. अजित देवळे व प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये, व्यावसायिक दृष्टिकोन आणि रोजगारक्षमता यात लक्षणीय भर पडल्याचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 06/Jan/2026














